मी कुठेतरी वाचलं होतं, जर तुम्हाला प्रसिद्ध लेखक व्हायचं असेल तर प्रथम तुम्हाला टोपणनाव घ्यावं लागेल. (लेखणी नंतर घेतलीत तरी चालेल 😊) म्हणून मग टोपणनाव घ्यायचं कठीण काम करून टाकलं. बाकी लेखन आणि प्रसिद्ध होण्याचं नंतर पाहू. टोपणनाव म्हणजे इंग्रजीत पेन-नेम. माझं नाव संतोष आहे. पण नावात काय आहे? असं सेक्सपीअर, सॉरी शेक्सपीअरने म्हणून ठेवलंच आहे ना! पुन्हा तेचं 'What's in a name?
आकाशवाणी, संतवाणी, भविष्यवाणी असते तशी संतूवाणी. यातील वाणीचे दोन्ही अर्थ घेऊ शकता आवाज किंवा किराणा दुकानवाला. दुकानातील वाणी पुड्या बांधतो, संतूवाणी पुड्या सोडतो अर्थात शब्दांच्या. 😉
संतूवाणीवरील लिखाण मराठीत आहे आणि सर्वसामान्य मराठी समजणाऱ्या व्यक्तीला ते कळेल अशी अपेक्षा. उगाच क्लिष्ट आणि जङजव्याळ शब्दरचना करून केवळ एकाच अभिजात वर्गातील अभिजनांना माझ्या साहित्यसेवेने उपकृत करणे 🤭 माझ्या आवाक्याबाहेरचे आहे. त्यामुळे अतिशुद्ध मराठीचा वापर टाळून समजण्यास सोपे असे काहीतरी लिहण्याचा प्रयत्न. हो पण व्याकरण आणि शुद्धलेखनाच्या चुका आढळल्यास निदर्शनास आणाव्यात.
संतूवाणीमध्ये विषयाला काही बंधन नाही. मला जे सुचतं ते मी लिहतो आणि मर्यादित प्रतिभा असल्याने जरा कमीच सुचतं. माझे मित्र म्हणतात तू छान लिहतोस. म्हणूनच ते माझे मित्र आहेत. 😃 😉
संतूवाणीमध्ये अनुक्रमणिकेनुसार वाचायची आवश्यकता नाही. जमेल तेव्हा, जमेल तसं, जमेल ते पानं वाचा. लिखाण आवडलं तर नमूद केलेल्या ईमेल-पत्त्यावर ई-मेल करा. समजा नाही आवडलं लिखाण आणि तुम्हाला वाटत असेल की माझ्यात (म्हणजे माझ्या लिखाणात) काही सुधारणा होऊ शकते तरीही ईमेलच पाठवा. 😉