आपण माणसांविषयी नेहमीच बोलतो. आज भुतांविषयी बोलू. म्हणजे माणसांमधील नाही खरोखरच्या(❓) भुतांविषयी. आता विज्ञाननिष्ठ म्हणतील, "ह्यॅऽऽ भूत वगैरै नसत!" प्रभू , ते मलापण कळतं. पण मनाला कोण समजावणार?
त्यात मी कोकणातला. त्यामुळे भूत हा आमचा जिव्हाळ्याचा विषय. अस्सल कोकणी माणसाला विचारा, दोनचार भूतं तर तुमच्या मानगूटीवर बसवणारचं. म्हणजे अगदी पुलंचा अंतू बर्वा म्हणाला असता, "शिंच्या, तो इंग्रजपण कोकणातल्या भूतांस घाबरून विलायतेस परत गेला हों". कोकणात तर देवचार, मुंजा, समंध, हडळ, चाळेगत, वगैरे अशी व्हरायटी मिळेल तुम्हाला. ☠️ चॉइस इज युवर्स !!!
पण माझ्या भूत काळातील आठवणी मुंबईतल्या आहेत. अर्थात बालपणीच्या! आता काय बिशाद आहे भुताची माझ्यासमोर येण्याची? (हे ऊसन अवसानं बरं!) आतासुद्धा मी टिव्हिवरील हॉरर मुव्ही ट्युबलाईट चालु ठेवून बघतो. हे सिनेमावाले खरोखरच्या भूतापेक्षा जास्त घाबरवतात. त्यातल्या त्यात सिनेमातली रामसे ब्रदर्सची भूत मला आवडतात. 😘
आमच्या बिल्डिंगमध्येसुद्धा अमावास्येच्या मध्यरात्री जागेवाला फिरतो अशी वदंता होती. जागेवाला हा प्रकार बऱ्याच जणांना माहित असेल. असे म्हणतात प्रत्येक जागेचा एक अदृश्य रक्षणकर्ता असतो (तरीपण काहिजणांनी त्याला प्रत्यक्ष पाहिलेलं असतं) तर हा जो जागेवाला असतो तो भूत, आत्मा कि आणखी काही माहित नाही, हा स्वतःहून तुम्हाला काही करत नाही परंतु त्याच्या कामात तुम्ही अडथळा आणलात किंवा त्याच्या वाटेत आलात तर मात्र तुमची खैर नाही. (मध्यरात्री तो काय करत असतो? त्यालाच विचारा)
ऐंशीच्या दशकातील हा कालावधी. म्हणजे तेव्हा भुतांनापण मुंबईत मोकळा श्वास घेता येत असे. आमच्या बिल्डिंगमधील आमचे सिनीयर मित्र आम्हाला भूतांच्या ऐकीव कथा ऐकवत. त्यावेळी काहीजण रात्री इमारतीच्या गच्चीवर झोपत. काहिजण सामाईक गॅलरीत झोपतं. त्याकाळी ही कॉमन गोष्ट होती आणि तेव्हा मोबाईल नसल्याने प्रत्यक्ष गप्पागोष्टी हाच विरंगुळा होता.
लहान मुलांना गच्चीवर जाण्यास सक्त मनाई होती आणि आमच्या गच्चीवर जाणं सोप्पसुद्धा नव्हतं, कारण शेवटच्या मजल्यावरून इमारतीच्या गच्चीवर जाण्यासाठी जिने नव्हते तर डुगडुगणारी लोखंडी शिडी होती. तिचीही शेवटची दांडी तुटलेली! लहानपणी गच्ची हि माझ्यासाठी कुतूहलाची जागा होती. तर हा जो जागेवाला होता तो बऱ्याचवेळा गच्चीवरच फिरायचा आणि गच्चीच्या कठड्यावरून खाली पाय टाकून गायब व्हायचा असं म्हणतात.
एकदा रात्री त्याने म्हणे तिसऱ्या मजल्याच्या गॅलरीत झोपणाऱ्या काकांना पायाने बाजूला केले होते व पुन्हा वाटेत न येण्याची वॉर्निंग दिली होती. दोन दिवस ते काका तापाने फणफणत होते. आमच्या बिल्डिंगमधील आठवणीतील अजून एक घटना आहे. एका तरूण मुलाला जागेवाल्याने चोपल्याची. अस सांगतात तो मुलगा अपरात्री दारू पिऊन गच्चीवर गेला होता आणि त्या रात्री नेमकी अमावास्या होती. त्याच्या म्हणण्याप्रमाणे जागेवाल्याने त्याला मारत मारत गच्चीवरून खाली आणले. आता तो नशेत पडून त्याला लागलं कि खरोखरच जागेवाल्याने त्याला प्रसाद दिला हे जागेवाल्यास ठाऊक.
अजून एक अफवा(?) होती पांढरी साडी नेसलेली, केस मोकळे सोडलेली बाई मध्यरात्रीच्या वेळी कोणीतरी दुसऱ्या मजल्यावर फिरताना पाहिली होती. पांढरी साडी आणि मोकळे केस हा बहुधा महिला भुतांचा गणवेश असावा. असो! सुदैवाने माझा भुतांशी कधी प्रत्यक्ष संबंध आला नाही. आणि आता तर मला वाटत माणसांसमोर टिकाव न लागल्याने भुतांनीदेखिल मुंबईतून गाशा गुंडाळला असावा.
जमलं तर पुढच्यावेळी सिनेमातील भूतांकडे बघून(?) घेऊ तोपर्यंत भूतरात्री आय मीन शुभरात्री!🙏
अभिजित4 years ago
नीना4 years ago
नेत्रा4 years ago
रविदत्त4 years ago
विनायक4 years ago
गीता4 years ago
सुनील4 years ago
संजय डी.4 years ago
संजय के.4 years ago
महेश4 years ago
प्रदीप4 years ago
समीर4 years ago
निकेता4 years ago
राजश्री4 years ago
दयानंद4 years ago
प्रसाद4 years ago
दिलीप4 years ago
तुमची प्रतिक्रिया लिहा