२७ जुलै २०२५

अभिषेक लॉन - झूईंग ४२० ✈️

संदर्भ: शाळूसोबतींचे स्नेहसंमेलन अभिषेक लॉन २६ - २७ जुलै २०२५

अभिषेक लॉन, आमचं आगमन

(यमक जुळवण्यासाठी आगमॉन वाचावे 🥳)

मी आणि पोष्टर बॉय संजय के. पिकनिकचे मुख्य अतिथी (स्वयंघोषित) असल्याने रविवारी सकाळीच ठाण्याला पोहचलो. रिक्षामार्गे येऊर जंगलात आलो. रिक्षावाल्याला अचूक लोकेशन माहीत नसल्याने गुगलमॅपची मदत घेतली. मला तर नकाशातील नॉर्थ, साऊथ, ईशान्य, वायंऽऽव्य, घंटा काय कळत नाही.

सरतेशेवटी रिक्षावाल्याने गुगलमॅपची माता-भगिनी एकत्र करत लोकेशनपासून दोन मिनिटं अंतरावर आम्हाला आणून सोडले. आता आम्ही दोघे अंदाजाने चालत होतो. आजूबाजूला बंद गेट असलेले बंगले व लगेच पोहचू म्हणून जल-विसर्जन थोपवून धरलेले आम्ही... आणि अचानक एका बंगल्यातून एक डेंजर कुत्रा बाहेर आला. 🐶 जर्मन शेफर्ड असावा.

तो एवढा मोठा होता म्हणजे मला आणि संजयला त्याने कुत्र्यासारखं मारल असतं. 😃 तो आमच्या दिशेने येत होता, कदाचित तो त्याच्या वाटेने जात असेल, पण आमची तंतरलेली असल्याने आम्हाला वाटलं तो आमच्याकडेच येतोय.

परिस्थिती इतकी बिकट होती कि त्याने जरी प्रेमाने 'काय भौ:' केल असत तरी आमचं जाग्यावरच 'टिप टिप बरसा पानी' सुरू झाल असतं... सुदैवानं बाजूच्या गेटमधून आमचे तिघे आले, दीपक, अभय आणि अनिल. तिघेही इंडियन 😍 मग आम्ही निश्चिंत झालो आणि योग्य जागी जल-विसर्जन करून नाश्त्यासाठी मार्गस्थ झालो.🚶

पीके : माझ्यासाठी ह्या पिकनिकचे मुख्य आकर्षण होते पीके ची भेट. बाकिचे मित्र अधूनमधून भेटतात. शाळेनंतर जवळपास ४० वर्षांनंतर पीके ला भेटलो. शाळेतल्या पीकेची चित्रकला खूप छान होती आणि हस्ताक्षरही सुंदर होतं (पण व्याकरणाची बोंब होती 😃) शाळेत माझ्यासारखीच शरीरयष्टी असलेल्या पीकेच्या अंगात रबरी चेंडूने आबाधुबी खेळताना कुठून जोर यायचा माहित नाही. आजही त्याच्या शारीरिक हालचालींवर मर्यादा असल्या तरी त्याचा उत्साह जोरदार आहे. प्रकाश चव्हाणला मित्र पीके का म्हणतात, त्याचे कारण कदाचित मैत्रिणींना माहित नसेल. तर पीके टोपणनावाचा पिण्याशी🍻 काही संबंध नाही. तसेच अमीर खानच्या पीके सोबतही 📻 नाही. तुम्हाला कदाचित वाटू शकत की, 'ब्वॉ शाळेत असताना प्रकाश शाळेचा गणवेश न घालता रेडिओ गळ्यात अडकवून आला असेल का?' 😜 तर तस काही नाहियं. तो अत्रे पी. के. वाला पीके आहे. Prakash Krishna Chavan. आशा आहे मित्रमैत्रिणींना भेटून प्रकाशही तेवढाच आनंदला असावा. दोन दिवस पेसमेकरला पण आराम मिळाला असेल, ते काम मित्रांसोबतच्या हास्यविनोदाने केलं असेल.😍 सुरेशदादांचे विशेष आभार, कारण त्यांच्या पुढाकारामुळे पीकेची भेट शक्य झाली.👍

झूईंग ४२० ✈️

आम्ही नाश्ताच्या टेबलापाशी आलो. तीन-चार रात्रपाळीचे शहेनशहा सोडले तर बाकी सगळे हजर होते. रात्रीचं जागरण कोणाच्या चेहऱ्यावर दिसत नव्हतं. प्रसन्नवदने नाश्ता सुरू होता. उपमा, पोहे, चहा, कॉफि ... छान चाललं होतं....पण मग नेत्राने (जी स्वतः ॲक्टिव्हा चालवते 🛵) जनरल नॉलेज म्हणून बोईंग विमानाचा विषय काढला. तेही साक्षात अवधूत समोर असताना.

तो ह्या विषयातला जाणकार आहे. ह्याच नाही बऱ्याचं विषयातला! मी तर म्हणेन अवधूत आणि तज्ञ हे समानार्थी शब्द आहेत. (ह्या वाक्यावर जे मनातल्या मनात हसतीलं त्यांना देवबाप्पा पापं करेल 👊) अवधूतने त्याच्या ओघवत्या शैलीत तांत्रिक माहिती द्यायला सुरू केली.

विलास, प्रदीप यांनी अधूनमधून प्रश्न विचारले पण अवधूतने त्यांना लीलया टोलवलं. शैकापण चर्चेत सामील झाला आणि अवधूतला ढकलत ढकलत अदानी पर्यंत घेऊन गेला. मध्येच 'इलेक्ट्रीकल इंजिनिअर" गणेश चर्चेत सामील झाला आणि त्याने काही वायरमन लेवलचे प्रश्नही विचारले (सोटू) 🤪 बरं, ही सगळी चर्चा सुरू असताना ॲक्टिव्हावाली गायब झाली होती!😃

पुणेकर हळूच कानात सांगून गेले एव्हिएशनची इत्यंभूत माहिती तज्ञांकडून आम्हाला काल रात्रीच मिळालीयं. रात्री काही वैमानिकांनी पेट्रोल टाकून उड्डाणेही केली होती म्हणे. असो! हवेत कसं उडायचं ते अवधूतने व्यवस्थित सांगितलं. 👍

हाय अल्टिट्यूड, लॅंडिंग गियर, रॅट, थ्रोटेल, (ओली भेल, सुकी भेल), प्रोपलेर अशा शब्दांचा भडिमार करत त्याने जमिनीपासून आकाशापर्यंतचा प्रवास उलगडवला. आपत्कालीन परिस्थितीत काय करतात ते सांगितले. काही मित्रमैत्रिणींच्या चेहऱ्यावर आपत्कालीन परिस्थिती स्पष्ट दिसत होती.😳

पण मी मात्र ठरवलंय मिळालेलं ज्ञान फुकट घालवायचं नाही. अवधूतने दिलेल्या ज्ञानावर आपण जवळजवळ पायलट झालोच आहोत, तर निवृत्त झाल्यावर पी.एफ. च्या पैशातून झूईंग ४२० विमान विकत घ्यायचं व प्रवासीसेवा सुरू करायची आणि प्रवाशांची सुरक्षितता म्हणून आपल हवाईजहाज जमिनीवरच चालवायचं. 👮

तळटीप: 'झूईंग ४२०' साठी वयोवृद्ध हवाईसुंदरी ना प्राधान्य दिल जाईल. 😃

समज - गैरसमज ...

नाश्त्याच्या टेबलावर अंडा-भुर्जी च्या बाजूला आरामात विराजमान झालेल्या पोहयांना येणाऱ्या झंझावाताची कुणकुण लागली होती, पण आम्हाला मात्र त्याची कल्पना नव्हती. आम्ही निवांत! नाश्ता करून मी मुलांच्या छावणीत दाखल झालो. काही मित्र नुकतेचं जागे झाले होते. काहींचा आंघोळीचा कार्यक्रम सुरू होता. (सामुदायिक नाही. वैयक्तिक 😎)

अनिल सगळं आटपून व्हरांड्यात बदकांना शिट्या मारत बसला होता. त्याच्याकडे दुर्लक्ष करत ती बदकं त्यांची-त्यांची पिसं उपटतं फिरत होती. अनिलच्या शिट्टीला प्रत्युत्तर म्हणून त्याच्याकडे बघून एक बदकाने 'प्याऽऽक प्याऽऽक' पण केलं. (त्यांच्या भाषेतली ती शिवी होती की प्रशंसा ते काही कळल नाही 🤪) आमची धमालमस्ती सुरू असताना मुलींचा घोळका खास पोलिस संरक्षणात आमच्या छावणीत आला. त्यांच्याकडून कळलं, एका नाश्त्या वरून मॅटर झालेला आहे.

कॅटरर्स वाल्यांना आगाऊ सूचना देऊनसुद्धा त्यांनी गडबड केली. त्यांनी दिलेला प्रस्ताव वर्षाला मान्य झाला नाही. मधल्यामध्ये आयोजक मित्र कात्रीत सापडले. समीर थोडा नाराज दिसला पण तो शांत होता. समीरच्या सहनशक्तीचं रहस्य, मी आणि सुनीलने शालेय दिवसात त्याला दिलेली ट्रेनिंग आहे. " मित्रांच्या पिकनिकमध्ये आयोजक हे बोलणी खाण्यासाठीचं असतात " हे त्याला समजावून सांगितले.

वर्षाने निदान स्वतःच्या तब्येतीसाठी तरी थोडं जुळवून घ्यायला हवं होत. असे आम्हांस वाटते. अवधूतने त्याच्या खास शैलीत डरकाळ्या फोडल्या पण त्याला, "समोर जाऊन बोल" म्हणाल्यावर तो म्हणाला, "म्यॉंव" ! 😹 मी काय वर्षाला घाबरत नाही त्यामुळे मी बिनधास्त बोललो, "एवढ होतं तर स्वतःच्या जेवणाची व्यवस्था स्वतः करायची !" (अर्थातच हे स्वगत असल्याने कुणाला ऐकू आलं नसेलं 😊)

आपल्यातील मैत्रीबंध मजबूत असल्यामुळे ते प्रकरण निवळलं आणि अवधूतने आयोजित खेळांना प्रारंभ केला.

टीप: आयोजकांना एक फुकटचा सल्ला आहे, वर्षाचा उपवास असेल त्या दिवशी पिकनिक आयोजित करायची म्हणजे वर्षाला पुण्य मिळेल आणि तुम्हाला शांती !😍
....

शुचिर्भूत होऊन अवधूतने खेळांना सुरूवात केली. (आपण करतो ती आंघोळ 😊). माईकचा ताबा घेत कार्यकर्त्यांना खेळाचे सामान आणण्यास पिटाळले. ग्रुपवरील एकजण चांगलं लिवतो म्हणून त्याला स्कोर लिवायला बसवलं. एकमेकांशी जमवून घेण्याच्या खेळात चार मुलींच्या ग्रुपचा (संध्या, वर्षा, कीर्ती, सुनिता) पहिला नंबर आला. नवलंच म्हणायचं! 🤭

ह्यापेक्षा मोठा चमत्कार नंतरच्या खेळात झाला. बाटलीत पेन टाकणे ह्या खेळातील विश्ववविजेता अवधूत आमचा कप्तान होता. मी, नीना, वर्षा गीता असे मान्यवर खेळाडू आमच्या संघात होते पण आम्हाला लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागला. आमच्या पराभवानंतर सर्व मित्रमैत्रिणींनी एकच जल्लोष केला (नेत्राने जरा जास्तच 😃! रफ वहीत नाव लिहलयं तिचं). स्पर्धा सुरु असताना मुलांचा एका ग्रुप पुणेकरांसोबत बसून जागतिक दर्जाच्या गप्पा मारत होता. ह्या पिकनिकला पुणेकरांना माझ्यासोबत जास्त संवाद साधता आला नाही, ही खंत त्यांनी जाताना व्यक्त केली. (मलादेखील जाणवलं आजूबाजूला मुली असल्यामुळे माझं त्याच्याकडे दुर्लक्ष झालं / केलं 😜)

दुपारचे जेवण आणि बक्षीस-समारंभ (प्रायोजक: नीना आणि अभय) कार्यक्रम साधारण एकाच वेळी सुरु होते. मी टॅलेंटेड(?) असूनसुद्धा मला एकही बक्षीस मिळाले नाही.😒 त्यांनतर एक चांगला उपक्रम होता, स्वानुभव कथनाचा. आपल्यामध्ये सर्वात हॅपनिंग आणि आव्हानात्मक कार्यक्षेत्र आपल्या ए.सी.पी. रविभाईंचे आहे. त्यांनी एका केस संदर्भातील अनुभव सांगितला. रवि, अवधूत, प्रसाद यांच्यासारखी वक्तृत्वशैली माझ्याकडे नसल्याने मी प्रेक्षकांमध्ये बसून टिंगलटवाळी करतो. पण त्यामुळे जबरदस्तीने माझ्या घशात 🎤 माईक कोंबण्याचा प्रयत्न झाला.

हे सुरू असताना माझ्या मागच्या रांगेतून एक मित्र सारखा 'ढाकूमाकुम ढाकूमाकुम' म्हणतं होता. म्हणजे त्याची फर्माईश होती पिकनिकची सांगता गोविंदाच्या गाण्यावर नृत्याने व्हावी. 🕺💃

अरे हो एक राहिलचं, "ती फुलराणी" मधील गीताने साभिनय सादर केलेली नाट्यछटा. 👌बेष्टचं ! तिच्या ॲक्टिंगचं जाऊ दे, ती काय मीपण करेन🤫. पण पन्नाशीत एवढ पाठांतर. माझं तर ग्रुपमधील फुलराण्या आणि फुलबाजांना ओपन चॅलेंज आहे. ते स्वगत पाठ करून पुढच्या पिकनिकला बिनचूक म्हणून दाखवल्यास रू. ७०१/- चे रोख पारितोषिक देण्यात येईल. ढाकूमाकुम ढाकूमाकुम👍

संबंधित लेख:
श्रावणातील स्नेहसंमेलन
मधली सुट्टी, स्नेहसंमेलन २०२१
वृंदावन सोहळा, स्नेहसंमेलन २०२४
You can Like, Share & Comment
- संतूवाणी

माझे शाळासोबती

तुमची प्रतिक्रिया लिहा

वाचकांचे अभिप्राय

गणेश1 year ago

संतुवाण्याच्या बेरकी नजरेतून काही क्षण निसटले त्यांचा गुंता इथे सादर करीत आहे.

प्रातः काली (म्हणजे सकाळी दहा वाजता) पोहे आणि नमकदार उपमा दाबून खाल्ल्यानंतर आता (कशाला) काय करायचे अशा विचाराने सर्वजण टेबलाभोवती गोळा झाले. अवधूत आख्यान चालूच होते. जमेल तसे प्रत्येकाने ज्ञान अवधूत कडून ओरबाडून घेण्याचा प्रयत्न केला. मागे शयनगृहात काहीतरी गलका झाला. कुणीतरी कोणाला तरी काहीतरी खायला आणायला सांगितले. कोणीही न ऐकल्यामुळे काहीही खायला आणले नाही. वर्षाला काहीच खायला न मिळाल्यामुळे तिने ग्रुप कमांडर गीता हिला झापले आणि झूईंग ४२० विमानातून पुढच्या वेळी प्रवास न करण्याचा आणि बहिष्कार टाकण्याचा निर्णय बोलून दाखवला. गांगरणे आणि ओशाळणे असे मिश्र भाव चेहऱ्यावर एकाच वेळी दाखवण्यात गीता माहीर आहे. (तुम्ही तिला चांगलाच धडा शिकवताना पाहिलेच आहे). तसे भाव तिने दाखवले आणि मुदपाक खान्याकडे धाव घेतली. जागरणाने डोळे तांबारलेले आणि आंघोळीस नंबर न लागल्यामुळे केस पिंजारलेले अशा त्राटिकेच्या अवतारात गीता तिकडे पोहोचली. तिथे जो मिळेल त्याला हाणल्यानंतर थोड्या वेळाने तिच्या राग शांत झाला. मुदपाकात अशी परिस्थिती होती की अन्न नाही, अन्न कराया सामग्री नाही... शेवटी हरकाम्यास परमुलखात पाठवून न्याहारीची व्यवस्था करण्याचे ठरले.

हरकाम्या मोहिमेस गेला परंतु तो काही माहिती देईना अथवा घेईना. त्यामुळे परत मागे जाऊन वर्षाला काय सांगायचे या काळजीने गीता गवत उपटणाऱ्या माणसाच्या कामाचे निरीक्षण करू लागली. अखेर एकदाची न्याहारीची पिशवी वर्षासमोर आली. कस्टमर केअर, पुणेकर आणि सुनील यांनी थाळी मांडली आणि आता आपल्याला चांगलेचुंगले खायला मिळणार या आशेने थाळीसमोर वर्षा येऊन बसली. न्याहारी म्हणून थोराड म्हणता येईल अशी इडली सादर झाली. ती बघूनच वर्षाचा उत्साह मावळला. चटणी ची पिशवी उघडणार तोच हरकाम्या परत आला, आणि ही चटणी तुमची नाही तुमच्यासाठी दुसरी घेऊन येतो असे म्हणून ती घेऊन गेला. आता झाली का पंचायत ? इडली कशा सोबत खायची या विवंचनेत वर्षा होती. इथे पुणेकरांनी आगाऊपणे (!) इडली चहात बुडवून खावी असा सल्ला दिला. (कस्टमर केअर - मनातल्या मनात : अरे चहा संपला आहे. कुठून आणणार ?) नवीन चहाला मॅनेजर एक तास सांगितला आणि उरलासुरला अर्धा कप चहा दिला. त्यात सुनील ची हिम्मत बघा. तो वर्षाला म्हणतो मी आठ दहा इडल्या चहात बुडवून सहज खाऊ शकतो. (कस्टमर केअर अर्थात मनातल्या मनात : अरे तिच्याकडे फक्त चारच इडल्या आहेत.) शेवटी वर्षाने दयाबुद्धीने एक इडली खाऊन उरलेल्या तीन सुनीलला दिल्या आणि ती निघून गेली.

सुनीलच्या हिमतीबद्दल थोडेसे....मागील सहलीत कोरस मध्ये शेवटच्या फळीत गाणाऱ्या सुनीलने यावेळी छातीठोकपणे गाणे गायले. तशात वाघ आला तर छत्रीच्या सहाय्याने त्याला कसा आडवा करायचा याची कला सुनीलला चांगलीच अवगत आहे.

सकल जणांना शहाणे करून सोडण्याची वृत्ती अवधूत कडून शिकून सुनीलने शैलेश आणि चार-पाच रिकामटेकड्या मित्रांना पहाटेची सैर घडवली, जेणेकरून वाघाशी कसे लढायचे याचे प्रात्यक्षिक देता येईल. वाघाचे नशीब बलवत्तर म्हणून तो (अर्थात वाघ) वाचला. त्यात असे झाले की रिकामटेकड्या मित्रांना कुत्र्यापासून बचाव करण्याची कृती अवगत होती. एक दोन अडीच अशी पावले चालल्यास कुत्रे तुमच्याकडे कुतुहलाने पाहतात पण तुमच्याजवळ पास फिरकत नाहीत हे रिकामटेकड्या मित्रांनी सिद्ध केले.असो.

इकडे कस्टमर केअरने मॅनेजरच्या मानगुटीवर बसून त्याला लगेच दुपारच्या जेवणासाठी रंगीत भाताचे फर्मान सोडले. त्याच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे मॅनेजरने टोलवाटोलवीचा प्रयत्न केला. परंतु दहा मिनिटे त्याचे डोके खाल्ल्यामुळे एकदाचे तो रंगीत भात घेऊन आला. ते खाऊन वर्षाची क्षुधाशांती झाली आणि ती बहिष्कार वगैरे टाकण्याचे विसरून गेली (असे तुम्हाला वाटते).

शेवटी सर्व पामरांना ज्ञानप्राप्ती करून दिल्याची दक्षिणा आणि ईश्वरीय संकेत प्राप्त झाल्यानंतर अवधूत ने उरलेला रंगीत भात संपवला असे काही जाणकारांचे निरीक्षण आहे.

वर्षा1 year ago

परवा पिकनिकला समजलं रवी दत्त, प्रदीप आणि संतोष तिघांची उंची सेम आहे. छे छे..आपली कुठे बिषाद (आमच्या सारख्या कमी  उंचीच्यानी नाहीच), वर नजर करून उंची मोजायची.. उगीच मान मुरगळली तर केवढ्याला पडेल...असो पण प्रशांत ने बनवलेल्या "या सुखांनो या" या चित्रपटात  जेव्हा एकाच ब्ल्यू जीन्स मध्ये आलटून पालटून  वेगवेगळ्या पोज मध्ये (कोणी उभ्या उभ्या कुणी बसून ) या सर्वांनी फॅशन शो मध्ये सोलो परफॉर्मन्स दिलेला पाहिला ..तेव्हा कुठे लक्षात आलं ....

टोपी घातलेला सर्व मित्रांचा फोटो पाहून मन गहिवरून गेलं.. असं वाटलं जणू सर्व भाऊबीजेच्या ओवाळणी साठी वाट बघत बसले आहेत. काही मैत्रिणीं त्यांच्या रूमजवळ गेल्याही होत्या प्रयत्न करायला .. पण तो पर्यंत बहुतेक मुहूर्त निघून गेला असल्याने ते राहून गेलं असावं.. केवळ एक दोन फोटो काढून समाधान मानलं पण आमच्या सारखे काही त्या क्षणालाही मुकले ..  स्वतःचाच अट्टाहास .. कोणाचा काय दोष..
बाअदब, बामुलाहिजा, होशियार!

मधली सुट्टी म्हणजे जगातलं पहिलं आणि एकमेव कोर्ट जिथं मॅटर चालू झाल्यानंतर तब्बल  १८ तासांनी   न्यायाधीश महोदय (जज साहेब)  हजर राहतात. आणि मग जेवढं पाहतील आणि ऐकतील, म्हणजे "याची देही याची डोळा" आणि आदल्या दिवसांच्या प्रसंगांसाठी "त्याची काना" ... इतक्या पुराव्यांवरून,  आपल्या लेखणीने  वर्डीक्ट लिहितात आणि ते वर्डीक्ट वाचून सगळ्याच पार्ट्या  हसत हसत घरी जातात.

जज साहेबांचा  किती तो मान ... जवळ जवळ १८ तास उशिरा आले.. तरीपण साहेबांना नाश्त्याचा मान पहिला आणि आम्ही आपले रांगेत वाट बघतोय .. काना मागून आली आणि तिखट झाली असंच  काहीतरी ...

नुसता इथंच मान पहिला नाही ...पण.. भलभले महारथी शनिवारपासून रांगेत उभे होते , आपल्या मधल्या सुट्टीच्या मंचावरील  तारका म्हणजे गटातल्या "नटी" बरोबर सेल्फी फोटो काढण्यासाठी आणि ऑटोग्राफ घेण्यासाठी .. पण तिथं पण पहिला नंबर जज साहेबांचा... त्याच्यानंतर कोणाचा लागला असेल तर त्याचं नशीब.. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या नटीला  एकदा पण टच अपची गरज लागत नाही.. सदाबहार

बऱ्याचदा जुने मित्र मैत्रिणी जेव्हा भेटतात तेव्हा काही मित्र-मैत्रिणींची एकमेकांशी नजरेस नजर मिळाल्यावर पोटात जणू गुडगुड व्हायला लागतं.. असं पिक्चर मध्ये पाहिलंय ... लहानपणी रंगवलेली स्वप्न कदाचित आठवत असतील .. पण मधल्या सुट्टीच्या जज साहेबांच्या नजरेला नजर भिडली की कित्येकांच्या पोटात भीतीमुळे गोळा येऊ लागतो..  हजर असताना जज साहेब शांतपणे गुपचुप सगळं ऑब्झर्व करतात आणि मग  पिकनिक संपल्यावर जज साहेबांची लेखणी कोणाला विटनेस बनवील आणि कोणा कोणाला कोणती शिक्षा ठोठावील हे विचार करणं सुद्धा आपल्या कल्पने पलीकडचं आहे.. आणि तशीच केस आली तर जज साहेब निकाल दिल्यावर निब सुद्धा तोडतील...

आयोजकांनी कृपया ताण घेऊ नये.. केटरर्स ची  जबाबदारी  आता जज साहेबांनी स्वतः घेतलेली आहे. त्यांच्या बऱ्याच काळा नंतर च्या पुन्हा नेमणुकी नंतर  आणि सुखदायक पुनरागमनाने मधल्या सुट्टीत  पुन्हा एकदा विनोदाचे वेगवेगळे चविष्ट पदार्थ सर्व व्हायला लागले आहेत.... कुणाचाही उपाशी  राहायचा आता प्रश्नच येत नाही 😋

रविदत्त1 year ago

अरे वा ! संतुवाणी चे मालिका मधील स्वरूप खुपच छान. तुझ्या मनाला भावलेल्या क्षणांचे रेखाटन खरेच कौतुकास्पद आहे. संतोषB तुझ्या लेख मालीकेचे इथे पंखे fans सगळेच आहेत. यातून संवेदनशील अनुभूती बाबत आम्हाला पण शिकायला मिळाल👌👌👍

समीर 1 year ago

संतोष नेहमीप्रमाणे मस्तच 👌👍🏽🙏🏼 कितीही साखरपेरणी केली तरीही तो लिहायचे तेच लिहिणार,पेपर आपण आधीच लिहीलाय आता कोणाची किती काढायची हे आता संतूमास्तरांच्याच हातात

रविदत्त1 year ago

समीरच निरीक्षण अगदी यथार्थ😀 संतोष मनस्वी आणी स्वछंदी आहे. कोणी लेखणी हातात देवून हवे तसे लिहून घेवू शकणार नाही.

संजय के.1 year ago

सुरेख 👌👌
बाकी कन्या शाळेत आजही वर्षा मॅडम ची दहशत आहे.😉😆

नेत्रा1 year ago

🤣🤣👊 तुझ लिखाण पण एकदम ढाकूमाकुम ढाकूमाकुम👍😃

गीता1 year ago

Superb. 😂😂😂sahi kahe

कीर्ती 1 year ago

सोटू 😂😂😂
वयोवृद्ध हवाई सुंदरीचा अर्ज कधी द्यायचा 😝😝😝
एकदम भारी.... मजा आली 👌👌

रविदत्त1 year ago

मी पण अर्ज भरणार security साठी😀Zooing 420 हवाई कंपनीचा HR अभय मेजारी👍 संतोष नाष्टानंतरच फिरण, मैफील,lunch table chats आणी ऐकमेकांना निरोप समारंभ चे विवेचन अजून बाकी आहे😀👍
संतोष ची करामत बघीतली की AI मानवी बुद्धीला bit करु शकत नाही याची खाञी पटली😘
वर्षा लय भारी. खरय अनेकांना वाटत असेल आता पुढची गजाल कुणावर?😀 तु मात्र चेंडू मस्त उतनी ही शिद्दतसे टोलावलास 👌👌👍

अभय 1 year ago

जबरदस्त..संतोष, एक नंबर

नीना 1 year ago

Superb write up 👌👌👌

राजश्री 1 year ago

ROFL. Too good 🤣🤣😂😂. Great 👍

शैका1 year ago

संतोष अवधूत लां ढकलण्या एवढी ताकद नाही कोणाची 😀

समीर1 year ago

संतोष कडे देखील नाही,एक अख्खा एपिसोड अवधूत रावांचा आहे, महाराज पण गालातल्या गालात हसत असतील 😁👌🙏🏼

गणेश1 year ago

झूईंग, ॲctiva, सोटू, ओली भेल ....😃. अचाट कल्पनाविस्तार.... 🫡🫡🫡
शुचिर्भूत, रफ वही... 😃👌. पुढील पिकनिकला तुझं सातशे एक रुपयांचे नुकसान होणार. शिवाय गीता जे विसरली (!) हे सुद्धा त्यात जोडून.... बोनस म्हणून... 😀

प्रशांत 1 year ago

Superb 👍👍...

सुनीता1 year ago

मस्त 👌👌😂

सुनील 1 year ago

झकास 👌🏼👌🏼👌

विलास के1 year ago

जबरदस्त 🥰

अनिल1 year ago

👌👌👌
Read more in this section:
वर्गशिक्षक: दहावी-अपी.टी. चा तासआठवणीतील बोंबाबोंब५० मार्कांचं संस्कृतगुगलचे मीठ अळणी७ वा वर्धापनदिनबॉईज ओन्ली - चर्चासत्रप्रसादचे पेनबंधमधली सुट्टीसुगंधी उटणंश्रावणातील स्नेहसंमेलनकन्याशाळेची भिंतस्नेहसंमेलन २०२१@ मुलुंड पोलीस स्टेशनमुलुंड ते काळाचौकीएक मुलाखत - गटप्रमुखांचीसुगंधी उटणं - एक प्रवासपन्नाशी पारची ऊर्जावृंदावन सोहळाअंधार चाळ ते ईका इलिटासअभिषेक लॉन -झूईंग ४२०
Close Video ❌
Share