दहावी-अ चा वर्ग म्हणजे आमच्या शाळेचा मानबिंदू असे. अ म्हणजे अभ्यासात हुशार मुलांचा वर्ग! अर्थात आमच्या वर्गातले काही महाभाग अभ्यासाव्यतिरिक्त गोष्टींमध्ये सुद्धा पटाईत होते (कोणत्या गोष्टी असं विचारू नका 😉).त्यातच आदल्या वर्षी आमच्या शाळेतील स्वप्निल वाळींजकर एस. एस. सी. बोर्डाच्या मेरिट लिस्टमध्ये आल्यामुळे शाळेच्या अपेक्षा खूपच वाढल्या होत्या. पण आमच्या वर्गाने अशा अपेक्षांच ओझं कधीच बाळगलं नाही. ही झाली पार्श्वभूमी, आता घटनेकडे वळू.
इतक्या वर्षांनंतर सुद्धा ही घटना लक्षात राहण्याचे कारण मी शालेय जीवनात फारच कमी वेळा मार खाल्ला होता आणि ह्या घटनेत मुख्यध्यापकांच्या हातून मार खाण्याचा बहुमान मला प्राप्त झाला होता.
पहिल्या मजल्यावर शाळेचं कार्यालय आणि मुख्याध्यापकांची केबिन याच्या शेजारीच आमचा वर्ग होता. त्या दिवशी तास सुरु झाला तरीसुद्धा बराच वेळ कोणी शिक्षक वर्गावर आले नव्हते. त्यामुळे वर्गात थोडीफार गडबड सुरु होती. पण अचानक कोणाला काय सुचले माहीत नाही, कोणीतरी वर्गाच्या दारं-खिडक्या बंद केल्या आणि आवाज काढायला सुरूवात केली , काहीजण बेंच वाजवू लागले. वर्गाचा दरवाजा खिडक्या बंद असल्याने बरेचजण बिनधास्त बोंबा मारत होते. अर्थातच चाळीस पन्नास मुले बोंबलत असतील तर पूर्ण शाळेला ऐकू जाणारच. बाजूच्या कार्यालयातून शिपाई व कारकून वर्गाजवळ आले. व्हरांड्याकडील खिडक्या व दरवाजा उघडला गेला. (गॅलरीसाठी व्हरांडा हा रावराणे सरांचा शब्द 😊)
मी आमच्या बाजूची खिडकी उघडत होतो आणि नेमका त्याचवेळी गॅलरीकडील खिडकीत आलेल्या कारकूनाने मला संशयित म्हणून टिपले. शप्पथ सांगतो! मी खिडकी बंद केली नव्हती, तर खिडकी उघडत होतो. (मित्रांनो आठवत असेल तर ज्यांनी त्या दिवशी खिडक्या बंद केल्या असतील त्यांनी हात वर करा 😀) मुख्यध्यापकांसमोर कारकूनसाहेबांनी आमच्याकडे अंगुलीनिर्देश केला. माझ्याबरोबर अजून तिघे संशयित होते एक माधव, दुसरा दया आणि तिसरा आठवत नाही. माधव आणि दया सराईत खेळाडू ! मुख्यध्यापकांसमोरसुद्धा हसत हसत पुढे आले. प्रथेप्रमाणे प्रत्येकाच्या कानाखाली आवाज आले. माझ्यासुद्धा!😭. पण प्रकरण एवढ्यावरच संपले नाही. मुख्यध्यापक खूपच संतापले होते त्यांनी सुनावले,
"चला सर्वांनी दप्तरं उचला आणि शाळेच्या बाहेर चालते व्हा! उद्या पालकांना घेऊन आल्याशिवाय शाळेत येऊ नका"
आम्ही आज्ञाधारक विद्यार्थ्यांप्रमाणे दप्तरं घेऊन शाळेच्या बाहेर आलो. बाहेर आल्यावर प्रसंगाचं गांभीर्य जाणवले. आता पुढे काय करायचे? त्याबाबत वेगवेगळे मतप्रवाह होते. व्यक्ती तितक्या प्रकृती!
"दहावीचं महत्त्वाचं वर्ष आहे आणि शिक्षक येत नाही वर्गावर म्हणजे काय?" (म्हणून काय तुम्ही बोंबा मारणार)
"अरे काही होणार नाही , आपला दहावी 'अ' चा वर्ग आहे. उद्या घेतील वर्गात" ('अ' चा आत्मविश्वास)
"आम्ही आवाज केला नाही आम्ही का शिक्षा भोगायची?" (लो. टिळकांच्या बालपणीची शेंगांची गोष्ट ऐकल्याचा परिणाम)
"उद्याचं उद्या बघू, आता शाळा सुटेपर्यंत मैदानावर खेळूया". (स्वच्छंदी)
अशावेळी आमचा वर्ग मॉनिटर संजय धुमाळ म्हणाला, मी सरांशी बोलून बघतो (True leader, leading from front). आमचे संजूबाबा गेले मांडवली करायला.
प्रत्येकी पन्नास रूपयाचा दंड भरणे, पालकांना घेऊन येणे व सर्वांनी माफीनामा लिहून देणे अशा तहाच्या अटी होत्या. संजयने गयावया करून दंड प्रत्येकी पाच रूपयांवर आणला. सर्वांच्या वतीने माफीनामा लिहून दिला. जेवढे सापडले त्यांच्या सह्या घेतल्या. जे महाभाग गायब होते त्यांच्या सह्यापण केल्या. माफीनामा घेऊन संजय मुख्यध्यापकांच्या केबिनमध्ये गेला आणि सरांना एक निरागस प्रश्न विचारला,
"सर आम्ही हा जो प्रत्येकी पाच रूपये दंड भरणार आहोत, त्याची आम्हाला पावती मिळणार काय?" 😡
तडकले ना मुख्यध्यापक, "चल चालता हो बाहेर". असं म्हणून संजयला हाकलूनच दिलं. (लहानपणापासूनच संजय हिशोबाला पक्का आहे. हाच संजय मोठेपणी *पुणेकर* झाला.)
दुसऱ्या दिवशी पालकांना न आणताच आम्ही शाळेत गेलो. दंड भरला की नाही आठवत नाही. आमचं शाळेत जाणे नेहमीप्रमाणे सुरू राहिलं. पण एक गोष्ट आठवते आणि सांगायला आनंद वाटतो की तेव्हा कोणीही असं म्हणालं नाही की "त्या चौघांनाच शिक्षा भोगू दे".
अशी असते शाळेतील मैत्री!! लव्ह यु फ्रेंड्स 😍
संजय आणि मुख्याध्यापक यांचा संवाद - कल्पना विस्तारवसंत5 years ago
संजय डी.5 years ago
नीना5 years ago
सुनील5 years ago
विनोद5 years ago
समीर5 years ago
अवधूत5 years ago
राजश्री5 years ago
गणेश5 years ago
गीता5 years ago
रविदत्त5 years ago
विनायक5 years ago
सुजाता5 years ago
प्रसाद5 years ago
वर्षा डब्ल्यू.5 years ago
अभय5 years ago
प्रकाश5 years ago
विलास के.5 years ago
प्रशांत5 years ago
संजय के.5 years ago
तुमची प्रतिक्रिया लिहा