मराठीतील एक सुप्रसिद्ध लेखक. त्यांचा स्वत:चा असा एक मोठा चाहतावर्ग आहे. मी देखील त्यांच्या लेखनाचा चाहता आहे. माझ्या आवडत्या लेखकांपैकी सु.शि. हे एक. तुम्ही मराठी कादंबरीचे नियमित वाचक असाल आणि अजूनही तुम्ही सुशिंची कादंबरी वाचली नसेल तर तुम्ही एका अवर्णनीय आनंदाला मुकलायत.
ओ गॉड ! हि मी वाचलेली सुशिंची पहिली कादंबरी. साधारण ३५ वर्षांपूर्वीं वर्गमित्र सुनीलने मला वाचायला दिली होती. कादंबरी इतकी उत्कंठावर्धक होती की एका बैठकीत वाचून संपवली. त्यातील 'मन्नत राझदान' उर्फ पंछी हे कॅरॅक्टर आजही लक्षात आहे. त्यानंतर मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचा सभासद झालो आणि सुशिंची पुस्तके वाचण्याचा सपाटाच लावला. सुशिंच लिखाण आजूबाजूच्या जगाचा विसर पडायला लावते आणि एका वेगळयाच विश्वात घेऊन जाते.
सुशिंच्या कथांमधली 'दारा बुलंद', 'मंदार पटवर्धन', 'फिरोज इराणी', 'बॅरिस्टर अमर विश्वास' ही पात्रं काल्पनिक आहेत अस वाटतंच नाही. फक्त रहस्यकथाचं नाही, तर सुशिंच इतर प्रकारचे लेखनही मनाला भावते. मग 'बरसात चांदण्याची' हि टीनएज प्रेमकहाणी असो कि तुकडा तुकडा चंद्र ! सुशिंच तरल, भावस्पर्शी लिखाण मनाला भुरळ पाडतं. त्यांच्या काही कथांवर आधारित चित्रपट, टी.व्ही. मालिका यांचीही निर्मिती झालीयं. अगदी हल्लीची मराठी वेब सिरीज समांतर ही त्यांच्याच कथेवर आधारित आहे.
इतक्या वर्षांपूर्वी लिहलेल्या कथा आजही तितकीच नशा देतात. सुशिंच्या लेखनाचं गारुड मनावरून तसूभरही कमी झालेलं नाहीयं !
तुमची प्रतिक्रिया लिहा