१५ सप्टेंबर २०१९

🎶 वादा तेरा वादा

आमची वर्गमैत्रीण गीताचा सहभाग असलेला कॅराओके संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाला जाण्याची अनेक कारणे होती, एकतर गीताने सर्वांना आग्रहाच निमंत्रण दिल होत. वरूणराजाने विश्रांती घेतली होती, कार्यक्रमाचे ठिकाण आमच्या टप्प्यात होते आणि कार्यक्रम विनामूल्य होता 🤪. अजून एक कारण गीताला कार्यक्रमाच निवेदन व्यवस्थित जमतंय कि नाही ते बघणे. (म्हणजे तिला काही मार्गदर्शनाची गरज लागली तर 😀) वर्गमित्रांपैकी जवळपासचे कोणी येतायत का? याचीही चाचपणी केली (समजा कार्यक्रम कंटाळवाणा झाला तर आपल्या कंटाळ्यात मित्र सहभागी झाले तर कंटाळा कमी होतो). इच्छा असूनही बऱ्याचजणांना शक्य होत नव्हत. पण सुदैवाने सुनील यायला तयार झाला (कदाचित तोही माझ्यासारखाच रिकामटेकडा असणार - म्हणूनच आमची मैत्री खास आहे ) खरंतर त्याचा कॅरम खेळायचा बेत होता पण तो रहित करून आम्ही वादा निभावण्याच ठरवल आणि कार्यक्रमाला हजर झालो.

आमचे दोन मित्र आमच्यापूर्वीच हजर झाले होते. किर्तीसुद्धा तिच्या मैत्रीणीला प्रोत्साहन देण्यासाठी आली होती. थोडा उशीरच झाला आम्हाला त्यामुळे गीताच गाणं ऐकता नाही आलं, पण ज्याअर्थी प्रेक्षक बसून होते म्हणजे ती चांगलीच गायली असणार. पण गीताच निवेदन मात्र सुंदरच होत , कुठेही अस जाणवल नाही कि निवेदनाचा तीचा पहिलाच प्रयत्न आहे. अगदी व्यावसायिक निवेदिकेप्रमाणे तिने रंगमंचाचा ताबा घेतला होता. तिच्या आवाजातील गोडवा आणि शब्दफेक ऐकण्याजोगी होती. प्रत्येक गाणं सुरू होण्यापूर्वी गीता त्या गाण्याविषयी थोडक्यात माहिती सांगत होती व रंगमंचावर येणाऱ्या गायकाला उद्देशून शेरोशायरी पेश करत होती. शेर ऐकवताना मान किंचीत तिरपी करून एका छान लयीत बोलण्याची अदा तर लाजवाब! प्रेक्षकांकडून सुद्धा गीताला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत होता.

बरेचसे गायक नवोदित असले तरी अतिशय तन्मयतेने गात होते. काही पट्टीचे गायक तर अप्रतिम गायले. काहीजणांना वन्स मोअरदेखिल मिळाला. कार्यक्रमाच्या मध्यांतरात रंगमंचावर जाऊन आम्ही सर्व गीताला भेटून आलो. शाळेनंतर पुन्हा एकदा किर्तीची ओळख करून घेतली. 😊

मध्यांतरानंतर गंमतच झाली. प्रेक्षकांकडून आम्हाला सुद्धा टाळ्या मिळाल्या, त्यासुद्धा गाण न म्हणता! अर्थात ह्याच श्रेय गीताला!

"माझे शिशुवर्गापासुनचे मित्र-मैत्रीण ह्या कार्यक्रमास उपस्थित राहिल्याने मला कार्यक्रम सादर करण्यास खूपच एनर्जी मिळाली आहे" असे गीताने म्हणताच उपस्थित प्रेक्षकांनी आमच्यासाठी टाळ्यांचा कडकडाट केला. (जे आले नाही त्यांनी मिस केलं यार 😍) आमचा एक मित्र तल्लीन होऊन गाणी ऐकत असताना त्याच्या WhatsApp वर एक मेसेज आला. मेसेज त्याच्या सौ.नी पाठवला होता. त्याने आम्हाला तो मेसेज दाखवला, अगदी प्रातिनिधिक स्वरूपाचा मेसेज होता तो. मेसेज वाचल्यावर सप्तसूरांच्या लाटेवरूंन जमिनीवर आलो. वहिनींनी आमच्या मित्राला मेसेज पाठवला होता "येताना कोथिंबीर घेऊन या"

गाणी आणि गीता ऐकता ऐकता चार तास कसे निघून गेले कळलंच नाही. स्वरानंदात न्हाऊन आम्ही स्वगृही परतलो. एका विनामूल्य प्रवेश असणाऱ्या कार्यक्रमाने अमूल्य आठवणींचा ठेवा दिला. 🙏

विशेष: आणि हो एक सांगायच राहीलं कार्यक्रमाच्या संचालकांतर्फे आम्हाला पुढील म्युझिकल-शोच आमंत्रण मिळालयं. 👍
You can Like, Share & Comment
- संतूवाणी

दिनविशेष

तुमची प्रतिक्रिया लिहा

✍️ तुमची प्रतिक्रिया लिहा

Read more in this section:
रात्रीस खेळ चालेवादा तेरा वादावादा - कोथिंबीरीचादिन दिन दिवाळीरंगभूमी दिनधक धक गर्लकालिदास दिनतू फेकताच भाला!सूर तेच छेडितागुरूपौर्णिमा सोशलव्हॅलेंटाइन डेसुहाना सफर - गरबानिसर्ग मेळासुहास शिरवळकरगो-मिठी दिन
Close Video ❌