प्रशांतचे मनोगत
मित्रांनो, वर्गमैत्रीण गीताच्या कार्यक्रमाची तारीफ करून झाली, आता माझी कहाणी ऐका. मी त्या कार्यक्रमाला प्रत्यक्ष हजर होतो आणि ज्या भाग्यवानाला कार्यक्रमादरम्यान कोथिंबीर आणण्याचा मेसेज आला तो मीच होतो. (विवाहित मित्रांनो, मला ठाऊक आहे जरी तुम्ही कबूल केलं नाहीत तरीही तुमच्या WhatsApp वरसुद्धा अशी हुकूमवजा विनंती येत असणार 😀)
मला संगीताची आवड कॉलेजच्या दिवसांपासुन लागली. गायनाचा छंद, नोकरी व्यवसायामुळे जोपासता आला नाही. मी अगदी पट्टीचा गायक नसलो तरी मी बरा गातो, असे माझे मित्र म्हणतात😊. शक्यतो गाण्यांचे कार्यक्रम मी चुकवत नाही. जेव्हा ग्रुपवर गीताने निमंत्रण दिले तेव्हाच ह्या कार्यक्रमाला जायचं निश्चित केलं होतं. त्याबरहुकूम सर्व गोष्टी जुळून आल्या आणि मी सभागृहात बसून कार्यक्रमाचा आस्वाद घेत होतो. मध्यांतरानंतर सौं.चा तो मेसेज आला. "येताना कोथिंबीर घेऊन या."
मनात एक विचार चमकून गेला , गायक किशोरकुमारला पण त्याची पत्नी रेकॉर्डिंगहून येताना भाजी आणायला सांगत असेल काय? (एक क्षण तर खुद्द किशोरकुमार भाजी मंडईत कोथिंबीरीवर कडिपत्ता फ्री मागतोय असे चित्र डोळ्यासमोर उभे राहिले) मेसेज सोबतच्या मित्रांना दाखवताच, मित्रांची प्रतिक्रिया होती, घरोघरी मातीच्या चूली.
आमचा कार्यक्रम सायन इस्पितळाच्या सभागृहात होता. कार्यक्रम संपायलाच पावणेदहा वाजले. आता कोथिंबीर कुठे मिळणार? संतू म्हणाला, "इस्पितळाच्या कँन्टीनमध्ये मिळतेय का बघ" (त्याच डोक जरा तिरकचं चालतं 😇) पण त्याकडे दुर्लक्ष करून घरी जाण्यास निघालो.
परतीच्या वाटेवर हाच विचार करत होतो , कोथिंबीर न घेता घरी गेलो तर सौ.रागावणार तर नाही ना? साधारणतः पत्नीवर्ग हुशार असतो, नवऱ्यावर कधी रागवायचे आणि त्याला कधी माफ करायचे हे त्यांना लग्नानंतरच्या एका आठवड्यातच कळते. (बिचारे नवरेमंडळी आयुष्यभर हा राग-लोभाचा गुगली समजण्याचा प्रयत्न करत असतात) कर्मधर्मसंयोगाने मला खूप समंजस सहचारिणी लाभली आहे, त्यामुळे असे समरप्रसंग क्वचितच येतात. ह्या वेळीसुद्धा नशीबाने साथ दिली, घरी जाण्याच्या मार्गावर एक भाजीवाला जणू माझीच वाट पहात होता. देवदूतच भासला तो मला. कोथिंबीर घेतली आणि सुटकेचा निःश्वास टाकला!
तुमची प्रतिक्रिया लिहा