घाबरू नका ! कालपरत्वे हे एवढंच संस्कृत लक्षात राहिलंय. आम्ही शाळेत असताना "संस्कृत हा स्कोअरींग सब्जेक्ट आहे " असं चार लोक म्हणायचे (हे चार लोक कधी दिसत नाहीत, ते फक्त म्हणतात) म्हणून आम्ही दहावीला ५० ग्रॅम संस्कृत आणि ५० ग्रॅम हिंदी घेतलं. निकाल लागल्यावर मला कळलं, सब्जेक्ट स्कोअरींग नसतो, अभ्यास केला तर सब्जेक्टमध्ये स्कोअर होतो.😊
संस्कृत व्याकरणाची तर आजही भीती वाटते. संस्कृतमध्ये सुभाषितमाला पाठ करणे व व्याकरणात शब्द चालवणे असे प्रकार असत. जसे रामः रामौ रामाः , देवः देवौ देवाः असे शब्द चालवावे लागत (आम्हाला तेव्हा फक्त सायकल चालवता येत असे) अजून एक शब्द आठवतोय माला माले मालाः, हा शब्द जरा बरा वाटायचा. मला ज्वेलथीफमधली वैजयंती माला😍 आठवायची . (हां तीच, होंठों मे ऐसी बात मैं दबाके चली आयी)
आठवी, नववीत संस्कृतचा पाया मजबूत न केल्याने, दहावीत त्यावर कळस चढवता नाही आला. रावराणे सरांनी खूप प्रयत्न केले. देवमाणूस ! 🙏 (सरांना वाटलं असेल ज्ञानेश्वरांचा रेडा वेद म्हणू शकतो तर ह्या टोणग्याला पण संस्कृत जमेल) पण संस्कृत मला कधी जमलंच नाही. संस्कृतच्या तासाला मागच्या बाकांवर तर आनंदी आनंद असे. बऱ्याचजणांना व्याकरणातील ओ की ठो कळत नसे, पण चेहऱ्यावरील भाव बघून वाटावं की हे घरीसुद्धा संस्कृतमधून संभाषण करत असतील. 😂
संस्कृतच्या परीक्षेमध्ये ३५ गुण पाठांतर व १५ गुण व्याकरण अशी गुणविभागणी होती. माझ्यासारख्या बऱ्याच जणांसाठी ३५ मार्कांचाच पेपर. कारण व्याकरणातील मार्कस् म्हणजे लॉटरी. पण वर्गात काही हुशार विद्यार्थी होते ज्यांना संस्कृत व्याकरणसुद्धा समजायच. ऊदा. विनायक गटले, विलास प्रभू, प्रसाद भुर्के, किसन खिलारी, विनय वारूळे, वगैरे .... प्रसाद आणि प्रभू तर पूर्वजन्मीचे ऋषीमुनीच असावेतं. (बाकीचे आम्हीदेखील ऋषीचं पण कपूर)
संस्कृतमधील काही काही शब्द मजेशीर वाटायचे. जस संस्कृतमध्ये 'भवति कुत्र गच्छति' म्हणजे , 'कुठे जात आहात?' यातील कुत्र म्हणजे कुठे. माझं भाषांतर असायचं 'कुत्र्या कुठे चाललायस' 😀
दहावीनंतर शाळेबाहेरच्या जगात आल्यावर संस्कृतचा उरलासुरला संपर्कसुद्धा तुटला. बोलीभाषा कानावर पडू लागली. संस्कृतमध्ये लोकांना संबोधण्यासाठी भो जनः असं म्हणतात, तर बोलीभाषेत भोxxx.😀 या कालप्रवाहात वाहता वाहता आमची भाषा असंस्कृत कधी झाली कळलंच नाही 🙏
विनय2 years ago
तुमची प्रतिक्रिया लिहा