शाळेत असताना काही आवडते शिक्षक असतात तर काही नावडते. रावराणे सर तेव्हा आवडते नव्हते, पण नावडतेही नव्हते. शिक्षक कसा असावा याचे एक उत्तम उदाहरण. बऱ्याचदा पुढच्या बाकावर बसणारे अभ्यासात हुशार विद्यार्थी व मागच्या बाकावरचे सत्ताधीश असा पक्षपात शिक्षक करतात. काही शिक्षक काही ठराविक विद्यार्थ्यांना झुकतं माप देतात. परंतु रावराणे सरांनी असा भेदभाव कधी केल्याचे स्मरत नाही. दहावीच्या महत्त्वाच्या वर्षात ते आमचे वर्गशिक्षक होते हे आमचे भाग्य.
त्यांच्या प्रत्येक विद्यार्थ्याने प्रगती करावी असे त्यांना मनापासून वाटे. स्वभाव म्हणाल तर अतिशय साधा-सरळ, तत्वनिष्ठ. नेहमीच स्थितप्रज्ञ असल्यासारखा चेहरा. चेहऱ्यावर हास्य म्हणजे ऊंबराच्या फुलाइतके दुर्मिळ. परंतु शिक्षकीपेशाशी त्यांनी कधीही प्रतारणा केली नाही. विद्यादानाचा वसाचं घेतला होता जणूं !
शुध्दलेखन, शब्दोच्चार याबाबतीत अतिशय आग्रही. जिथे एका मार्काची अपेक्षा असे, तिथे अर्धा/पाव मार्क देऊन उपकृत करतं, हेतू हाच की त्यांच्या विद्यार्थ्याने जास्तीत जास्त अचूकतेकडे जावे. कधीकधी अतिरेकही वाटायचा. रावराणे सरांबद्दल नेहमीच एक भीतीयुक्त आदर राहिला. अगदी संस्कृतच्या तासालासुद्धा, डोक्यावरून जाणारे संस्कृत पकडण्याचा प्रयत्न राहिला, सरांची टिंगल करावी असं कधीच वाटलं नाही.
सरांचे काही टिपीकल शब्द आजही लक्षात आहेत, जसं गॅलरीला व्हरांडा आणि दप्तराला पिशवी! "गृहपाठ केला नाही तर व्हरांड्यात बसावे लागेल" आणि "सरांनी सांगितले आहे तर आपआपल्या पिशव्या घेऊन चालू लागा" (जेव्हा एके दिवशी आमच्या वर्गाने दहावीत अभूतपूर्व गोंधळ घातला होता. ते तुम्हाला आठवणीतील बोंबाबोंब मध्ये वाचता येईल)
एक जाणवतं शाळा आणि शिक्षकांविषयी आपल्या पिढिला जे दृढ भावनिक बंध होते ते हल्लीच्या जनरेशन नेक्स्ट कमी जाणवतात. (अपवाद असू शकतात) गॅजेट्स आणि तंत्रज्ञानाच्या भडिमारामुळे असेल कदाचित! आज आपण जीवनात जे काही थोडंफार यश मिळवलं आहे त्यात शिक्षकांचा हातभार नक्कीच आहे. मला शिक्षणाचे धडे देणाऱ्या सर्व अधिकृत, अनधिकृत शिक्षकांना आजच्या शिक्षकदिनी एक साथ नमस्ते !
मिलिंद जे.1 year ago
मनिषा2 years ago
प्रसाद4 years ago
विलास पी.4 years ago
रविदत्त4 years ago
संतोष एम.4 years ago
प्रशांत4 years ago
विनायक4 years ago
नीना4 years ago
उदय 4 years ago
गणेश4 years ago
राजश्री4 years ago
दयानंद4 years ago
गीता4 years ago
सुनील4 years ago
तुमची प्रतिक्रिया लिहा