आज सकाळी सकाळी ऑफिसला जाताना एक कावळा डोक्यात गेला. म्हणजे खांद्यावर शिटला. टप् असा आवाज झाल्यावर पहिली प्रतिक्रिया होती "ओ शीट !" म्हणजे शीटेवरून पक्षी ओळखण्याएवढा मी पक्षीतज्ञ नाहीये, पण तो कावळा असावा कारण त्यांची संख्या त्या परीसरात जास्त आहे. तशा कोंबड्यापण दिसतात आजूबाजूला पण कोंबड्या एवढ्या ऊंच ऊडून स्टंट करतील अस वाटत नाही.😄
थोडासा शर्टवर आणि थोडासा ऑफिस बॅगच्या पट्ट्यावर असा दुहेरी कार्यभाग साधला होता दुष्टाने. अशावेळी स्वत:वर चरफडण्याखेरीज काहिच करू शकत नाही आपण. म्हणजे आपण म्हणतो मनुष्य हा बुद्धिमान प्राणी आहे पण त्या य:कश्चित कावळ्याचं काहीही वाकड करु शकत नाही. रागाने वरसुद्धा बघू शकत नाही, न जाणो त्याचा कार्यक्रम अजून बाकी असेल तर..😂 बॅगमधील जुन्या वर्तमानपत्राचा उपयोग करून बॅग आणि शर्ट स्वच्छ केलं. केवढ्या बढाया मारतो आपण! पण एक साधा कावळा आपल्याला हतबल करतो.
बर ते शीटण्याचं जाऊ दे, पण त्यासोबत काही संकेत पण जोडलेले आहेत, त्याला अंधश्रद्धा म्हणायचं कि नाही? ते ज्याचं त्याने ठरवायचं. अस म्हणतात तुमच्या अंगावर कावळा शीटला तर त्या दिवशी काहीतरी लाभ होतो. कदाचित होतही असेल! परंतु लाभसंकेत देण्याची ही कुठली पद्धत? एखाद झाडाच पान टाक अंगावर किंवा छोटासा दगड टाक. अगदी डोक्यावर अलगद टोच मारली तरी चालेल (लाभ होणार असेल तर काय हरकत आहे? 😊)
नंतर विचार केला, आपण पितॄपक्षात कावळ्याच्या रूपात आपले पित्तर शोधतो, त्यातलेच कोणीतरी आजोबा, पणजोबा, खापरपणजोबा असावेत. आपल्या वंशजाला काहितरी लाभ होणार आहे म्हणून त्यांना आनंद होत असेल आणि ती त्यांची आनंद व्यक्त करायची पद्धत असेल.😍 ओह शीट!!!
तुमची प्रतिक्रिया लिहा