१० फेब्रुवारी २०२०
सूर तेच छेडिता

🎼 सूर तेच छेडिता 🎹 🎤

संदर्भ: सो-गो परिवार - बी.एम.सी., यांनी २७ फेब्रुवारीला साजरा होणाऱ्या मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून मराठी गाण्यांचा कार्यक्रम सादर केला. त्या कार्यक्रमाचा वृत्तांत.

सो-गो परिवार बी.एम.सी., यांनी मराठी गीतांचा बहारदार कार्यक्रम सूर तेच छेडिता सादर केला त्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक आभार ! आमची वर्गमैत्रीण गीताकडून सोगो च्या कार्यक्रमाचे निमंत्रण आम्हाला येतच असते. तसेच ह्या कार्यक्रमाचेसुध्दा आले.👍 नेहमीचे प्रशस्त सभागृह नव्हते, परंतु सभागृहात पाऊल ठेवताच मराठमोळया वातावरणाची जाणीव झाली. सर्व सो-गो परिवार महाराष्ट्रीयन पेहेरावात (अगदी फेटयांसासहित ) वावरत होता.

सर्वात्मका सर्वेश्वरा ह्या नाट्यगीताच्या ध्रूवपदाने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. त्यानंतर विठू माऊली हा अभंग.🙏 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गीताकडे होते. आता गीतामॅडम निवेदनकलेत पारंगत झाल्या आहेत. 🎤 खुमासदार निवेदन करणारी गीता आणि कार्यक्रमाची सुंदर संहिता जुळून आली होती. गीताला मराठमोळा फेटा छान शोभून दिसत होता. अगदी मेरी झाशी नहि दूंगी म्हणाली असती तरी खपून गेल असत 😊

अलीकडे मराठी गाणी कानावर पडण्याचे प्रमाण कमी झाले आहे. हां तशी हळदीत किंवा D.J. वर वाजतात. पण ती ढिनचॅक साँग असतात. 💃 ती गाणी देहात वाजतात पण मनात वाजत नाहीत. मनाचे सूर छेडणारी गाणी सूर तेच छेडितामध्ये सादर झाली. सो-गो चे सर्वच कलाकार सादरीकरणासाठी खूप मेहनत घेतात. कार्यक्रम मराठी गीतांचा असल्याने मोजकाच श्रोतेवृंद होता, पण दर्दी रसिक होते. 👏 कलाकारांना छान दाद देत होते. निवडलेली सारीच गाणी छान होती. काही गाणी अशी असतात जी थेट तुमच्या 💖 ह्रदयाचा ठाव घेतात. पण त्यासाठी तुम्हाला मराठी भाषेची जाण असण आवश्यक आहे.

आज राणी, पूर्वीची ती प्रीत तू मागू नको, कालचे वेड्या फुलांचे रंग तू मागू नको किंवा भातुकलीच्या खेळामधील राजा आणिक राणी, अर्ध्यावरती डाव मोडला अधूरी एक कहाणी
सारखी विरहगीतं तुम्हाला तुमच्या न झालेल्या प्रेमभंगाची 💔 आठवण करून देतात.(हो पण तुमच्या इंग्रजी माध्यमात शिकून कॉलेजमध्ये गेलेल्या मुलांकडून हि अपेक्षा करू नका, तुम्हाला What is भातुकली? पासून समजावून सांगावे लागेल त्यापेक्षा प्रेमभंग परवडला 😀)

पूर्वार्धात सोलो गाणी आणि उत्तरार्धात युगुल गीत (द्वंद्वगीत असेहि म्हणता येईल, पण मग द्वंद्वयुद्ध पण असत ना म्हणून तूर्तास युगुल गीत म्हणू 🥰) अशी गाण्यांची विभागणी होती. मध्यांतरापूर्वी वेडात मराठे वीर दौडले सात गाणं सादर झालं, हे गाणं कधीही ऐकलं तरी अंगावर रोमांच ऊभे राहतात (ह्या गाण्यामागील इतिहासाचा संदर्भ माहीत असेल तर उत्तमच)

गालावर खळी, रुपेरी वाळूत माडाच्या बनातं , मनाच्या धुंदीत लहरीत ये ना, सूर तेच छेडीता, पतंग उडवीत होते सारखी छान छान गाणी पूर्वार्धात सादर झाली. उत्तरार्धात हि धुंदी कशाने आली, चंद्र आहे साक्षीला सारखी सुंदर युगूलगीतं ऐकायला मिळाली. किती अप्रतिम शब्दरचना आहेत ह्या गाण्यांमध्ये! नुसती गाणी वाचलीत तरी मनाला आनंद मिळतो. सूर-ताला सहित ऐकायला मिळाली तर बहारच.😍 कार्यक्रमाचे अंतिम पर्व अर्थात उडत्या चालींच्या गाण्यांचे होते. मग काय सो-गो परिवाराने कल्लाच केला. विशेष कौतूक करावे लागेल प्रीती मॅडमचे , प्रीतीमॅडम म्हणजे ऊर्जेचा खळाळता झराच. संगीताचा मनमुराद आनंद कसा घ्यावा हे त्यांच्याकडून शिकावे.

एकंदरच कार्यक्रमाने रसिकांच्या मनाचे सूर नक्कीच छेडिले. 🙏🎼
You can Like, Share & Comment
- संतूवाणी

दिनविशेष

तुमची प्रतिक्रिया लिहा

✍️ तुमची प्रतिक्रिया लिहा

Read more in this section:
रात्रीस खेळ चालेवादा तेरा वादावादा - कोथिंबीरीचादिन दिन दिवाळीरंगभूमी दिनधक धक गर्लकालिदास दिनतू फेकताच भाला!सूर तेच छेडितागुरूपौर्णिमा सोशलव्हॅलेंटाइन डेसुहाना सफर - गरबानिसर्ग मेळासुहास शिरवळकरगो-मिठी दिन
Close Video ❌
Share