आमच्या बालपणीची म्हणजे साधारण ऐंशीच्या दशकातील दिवाळी. शाळेत असताना सहामाही परीक्षा सुरु झाल्यापासुनच दिवाळीच्या सुट्टीचे वेध लागायला सुरुवात होत असे. त्या आनंदात थोडाफार अभ्यासपण होई. पेपर नेहमीप्रमाणे सोप्पेच जातं (नंतर मिळालेल्या मार्कस् वरून कळत असे, अरेच्च्या! सोडवताना पेपर सोप्पा होता , तपासल्यावर कठिण कसा झाला! जाऊदे पण त्या आठवणी नको आता)
मध्यमवर्गीय गिरणगावात दिवाळीला पंधरा-वीस दिवस बाकी असतानाच दिवाळीच्या तयारीला सुरुवात होत असे. तेव्हा मध्यमवर्गीयांसाठी दिवाळी म्हणजे नवीन कपड्यांची खरेदी, तिखडगोड फराळ, फटाके यांवर मनमुराद खर्च करण्याचा सण. मध्यमवर्गाची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने वर्षभर भरमसाठ खर्च करणे परवडण्यासारखे नव्हते. तेव्हाचा मध्यमवर्ग आज उच्च मध्यमवर्गात पोहचलाय. जीवनशैली (लाईफस्टाईल) बदललीय. आता वर्षभरात कधीही ब्रँडेड कपडे, शुज, मिठाई खरेदी करू शकतो. पण तेव्हा आईबाबांबरोबर केलेल्या दिवाळीच्या खरेदीची नवलाई त्यात नाही. आताच्या खरेदीत नकळत मनामध्ये ब्रँडेड जगाचा फोलपणा जाणवत रहातो.
शाळेला दिवाळीची सुट्टी असली तरी दिवाळीचा अभ्यास असायचाच. प्रत्येक तारीखवार अभ्यास करावा अशी अपेक्षा असे, पण माझ्यासारखे काहीजण जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर तो अभ्यास संपवत. म्हणजे संपूर्ण सुट्टीत नो टेंशन! काहीजणांची सुट्टी संपली तरी दिवाळीचा अभ्यास संपत नसे.😀
दिवाळीच्या फराळामध्ये करंज्या करण्याचा मोठा जामानिमा असे. चकली, करंज्या मोहिम फत्ते करण्यासाठी शेजारील कुटुंबांकडून मनुष्यबळ घेतल जाई. खरंतर अख्खी इमारत हेच एक मोठ्ठ कुटुंब असे. रहिवाशी एकमेकांना फराळ बनवण्यासाठी मदत करत व दिवाळीच्या दिवशी इमारतीमध्ये फराळाचे आदानप्रदान होई. दुपारच्या वेळी महिला मंडळामध्ये, कोणाच्या चकल्या फसल्यायत? कोणाच्या चांगल्या झाल्यायत? कोणाचे लाडू हातोड्याने फोडावे लागले 😀 याची गहन चर्चा होई. पण त्यातही नात्यांचा गोडवा असे. आता फ्लॅटसंस्कृतीमुळे ही प्रथा अस्तंगत होत आहे. सध्या कालानुरूप ऑनलाईन रेडिमेड फराळ बुकिंगचे दिवस आहेत.
दिवाळीतील अजून एक आकर्षण म्हणजे आकाशकंदील🏮. दिवाळीत प्रत्येकाच्या घरासमोर एक छानसा कंदिल, पणत्यांची आरास आणि रांगोळी ! काही इमारतींमध्ये सर्व घरांसमोर एकसारखे कंदिल असत तेदेखील इमारतीतल्याच बाळगोपाळांनी बनवलेले. तसेच दोन-चार रात्री जागून, गच्चीवर मित्रांसोबत थट्टामस्करी करत इमारतीसाठी सार्वजनिक कंदील/चांदणी बनविणे हा दरवर्षीचा कार्यक्रम. आता बऱ्याच ठिकाणी हे कामसुद्धा Outsourced केले जाते.
लहानपणी दिवाळीत सर्वात जास्त आवडणारी गोष्ट म्हणजे फटाके! फुलबाजा, भुईचक्र, पाऊस, तडतडी , सापाच्या गोळय़ा, आपटी बार, पेन्सील असे छोट्यांचे फटाके तर मोठ्या मुलांसाठी लक्ष्मी बार, ताजमहाल, डबलबार, सुतळी बाँब, रॉकेट असे फटाके असत. फटाक्यांच्या खोक्यावरील आकर्षक चित्रसुद्धा जपून ठेवली जात, शाळा सुरू झाल्यावर मित्रांना दाखवण्यासाठी.
💣 ध्वनिप्रदूषण व वायूप्रदूषणवाले तेव्हा नव्हते त्यामुळे फटाके वाजवण्यावर वेळेचे बंधन नव्हते. पण मिळालेला फटाक्यांचा स्टॉक लिमिटेड असल्याने चार दिवसात कोणते फटाके कधी वाजवायचे याचे प्लॅनिंग केलेले असे. बंदूक आणि रोल कॅप , टिकल्या घेऊन मित्राबरोबर दुपारतिपार चोर पोलिस खेळ चाले.(आता घरबसल्या ऑनलाईन गेम 🔫) कमी खर्चात जास्त वेळ फटाके वाजवण्याची आयडिया म्हणजे लंवगीची माळ सोडून एक एक लवंगी वाजविणे 😀. इमारतीच्या आवारात पडलेले, न वाजलेले फुसके फटाके गोळा करून त्यांना आग लावणे यासारखे उपदव्यापसुद्धा घरच्यांचा डोळा चुकवून चालत.
आताशा वयोमानानुसार फटाक्यांचा आवाज सहन होत नाही. पण शोभेचे दारूकाम बघायला छान वाटते (बाकीचे दारूकाम प्रासंगिक असतेच 😝). आताही दिवाळी आनंदाने आणि उत्साहाने साजरी करतोच पण ती स्वतःच्या कुटुंबापुरतीच आहे असे वाटते. लहानपणीची मनमोकळी, उनाड दिवाळी कुठेतरी हरवलीय ! कालाय तस्मै नमः 🙏
प्रथमेश 3 years ago
सुजाता3 years ago
शशिकांत3 years ago
शैलेश के.3 years ago
रविदत्त3 years ago
गणेश3 years ago
प्रसाद3 years ago
रोहित3 years ago
अमित डी.3 years ago
समिता3 years ago
वर्षा3 years ago
सुनील3 years ago
नेत्रा3 years ago
नीना3 years ago
विनायक3 years ago
नरेश3 years ago
उदय3 years ago
प्रतिमा3 years ago
अजित3 years ago
चारू3 years ago
शेखर3 years ago
सायमन3 years ago
प्रभा3 years ago
काका3 years ago
जगदीश3 years ago
महेश बी3 years ago
तुमची प्रतिक्रिया लिहा