अभय मेजारी, नेहमी हसतमुख असं प्रसन्न व्यक्तिमत्व. कधीही भेटा चेहऱ्यावर निखळ हास्य विलसतं असते. अगदी हसमुखराय आणि कंपनीच्या हसमुख चहाचा ब्रँड अम्बॅसेडर म्हणा ना! ज्याच्या गुड मॉर्निंग मेसेजने आपली सकाळ होते. आपल्या ग्रुपमध्ये जे अनेक कलाकार आहेत त्यातला हा एक छुपा गायक. (शाळेत असतानापण तो वेगवेगळे आवाज काढायचा 😉) अभयच्या परिवारात तर कलाकारांची मांदियाळीच आहे.
अभयची दिलदार वृत्ती वाखाणण्याजोगी. नाहितर हल्ली आजूबाजूला आवळा देऊन कोहळा काढणारे बरेच भेटतात. पण अभय मित्रांसाठी हातचं काही राखून ठेवतं नाही. मग बंगला असो, गाडी असो की कॅराओके सिस्टिम असो. अभयची कॅराओके सिस्टिम म्हणजे आमच्या पिकनिकचं खास आकर्षण असते. जिथे संसाराच्या रहाटगाडग्यात दबलेले किशोर, रफि, मुकेश मनसोक्त गाऊ लागतात. कधीकधी अतिउत्साहात सिस्टिमचं नुकसान झालं तरी अभय कधी नाराजी व्यक्त करत नाही.
शाळेतला एक प्रसंग आहे, कितीजणांना आठवतोय बघा. कुठल्यातरी ऑफ-तासाला शिक्षक वर्गावर आले होते. जे शिक्षक आले होते त्यांना विद्यार्थी नियमित तासालादेखिल घाबरायचे नाहीतं. त्यामुळे वर्गात दंगामस्ती सुरू होती. सर शांतपणे खुर्चीवर डोळे मिटून बसले होते.
काहिजण रबरबॅंडला कागद लावून एकमेकांशी लढाई करत होते. त्या लढाईत कोणाचातरी नेम चुकला आणि कागदी बाण फाट्कन सरांच्या डोळ्याला लागला आणि सरांचे डोळे उघडले. अघोषित युध्दसमाप्ती आणि चारो तरफ सन्नाटा! दुसरे कोणते शिक्षक असते तर साऱ्या वर्गालाच शिक्षेला सामोरे जावं लागल असतं. पण सर इतकचं म्हणाले,
"मी कोणालाही शिक्षा करणार नाही, पण ज्याने हे केलयं त्याने उभं रहावं. अन्यथा मी तुम्हाला शिकवणार नाही."
घडलेली घटनाच एवढी अनपेक्षित होती कि काय करावं कोणालाच सुचत नव्हते. कोणीच उभं राहिल नाही. (हे म्हणजे अस झालं आमच्यातल्या रबरधारी अर्जूनाने चुकून का होईना लक्ष्यभेद केला पण स्वयंवराला उभा राहिना). तास संपला. शाळा सुटली. आम्हाला वाटलं सुटलो! पण तस नव्हतं.
दुसऱ्या दिवशीही सर त्यांच्या म्हणण्यावर ठाम होते. सर शिकवणार नाहीत म्हणजे सगळ्यांचच नुकसान. कोणा एकाच्या चुकिची शिक्षा सगळ्यांना मिळणार. प्रसंग बाका होता. अर्जून अज्ञातवासातच !
परंतु 'मित्रांसाठी काय पण!' म्हणजे काय हे अभयने त्यादिवशी दाखवून दिलं. स्वत: चूक केलेली नसताना सुद्धा अभयने कबुली दिली . तेव्हा ती बाब फार मोठी वाटली नव्हती. पण आज व्यावहारिक जगाचा अनुभव घेतल्यावर जाणवतं, अभयने वर्गमित्रांसाठी किती धाडसी निर्णय घेतला होता.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे अभय आजही तसाच आहे. (आणि आजही रबरधारी अर्जून कोण? हेही गुलदस्त्यातच आहे) असो!
अभय तुझ्या आयुष्यात आनंदाचा पारिजातक असाच बहरतं राहू दे आणि तुझ्या चेहऱ्यावरील हास्य असेच कायम असावे. ही ईश्वरचरणी प्रार्थना! पुन्हा एकदा वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !!!
रविदत्त4 years ago
संजय डी.4 years ago
अभय4 years ago
गणेश4 years ago
गीता4 years ago
प्रदीप4 years ago
दयानंद4 years ago
दिगंबर4 years ago
अवधूत4 years ago
प्रसाद4 years ago
तुमची प्रतिक्रिया लिहा