👕 "पप्पा मला 'अपना टाईम आयेगा' लिहलेलं टि शर्ट हवयं.", माझा मुलगा मला म्हणाला. मी लगेच सवयीनुसार त्याला तत्वज्ञान सांगितले, "असं अपना टाईम आयेगा टी-शर्ट घालून आपला टाईम येत नाही, त्यासाठी मेहनत करावी लागते. नुसतं 'गलीबॉय' मुव्ही बघून आणि टि-शर्ट घालून काही होत नाही."
नंतर मला आठवलं, अरेच्चा! आपणही 'मैने प्यार किया' मुव्ही बघून FRIEND लिहलेली कॅप घेतली होती. जस काही ती कॅप घालून आपण प्रेम(सलमान खान) होऊन लगेच आपल्याला सुमन (भाग्यश्री) मिळणार होती. आता तो सगळा बालिशपणा वाटतो, पण त्यावेळी ती चंदेरी स्वप्न खरी वाटायची. 😍
आता तुम्हीच विचार करा, मैने प्यार किया मध्ये घरात सायकल चालवण्याएवढं मोठ्ठ घर (बंगला) दाखवलयं सलमानच आणि आम्ही हौसिंगबोर्डाच्या २२० स्क्वेअर फूटच्या घरात! घराचं एकवेळ अड्जस्ट करू. बरं! आपल्या तीर्थरुपांना आलोकनाथसारखा मित्रपण असायला हवा. समजा चुकून जरी आपल्या वडिलांचा असा मित्र असेल तरी तो त्याच्या सुमनला आपल्या प्रशस्त(?) घरात ठेवून घेण्याची विनंती करेल का? पण त्या वयात असे फालतू प्रश्न पडतचं नाहीत.
प्रत्येक पिढीचं असं 💞 चंदेरी स्वप्न पहाण्याच एक वय असतं, आपल्यावेळी ते वय साधारणतः कॉलेजमध्ये असताना होत, आताची पिढी शाळेत असताना पाहते. अगदी मी माझ्या बाबांना विचारलं तेव्हा मला कळलं ते सुद्धा त्यांच्या तरूणपणी देवानंदसारखा केसांचा कोंबडा काढतं. अर्थात चित्रपटसृष्टीचं गारूड आपल्या मनावर नक्कीच असतं. काही अपवाद असतात याला!
🎬 आठवतय का बघा तुम्हाला? तुमच्या तरुणपणी कोणता सिनेमा पाहून कोण व्हावसं वाटल होत? अजूनही तरुण असालं तर लगेच जाऊन अपना टाईम आयेगा लिहलेलं टि-शर्ट घेऊन या! 😊
तुमची प्रतिक्रिया लिहा