शाळेत असताना पी.टी. चा तास हा बहुतांशी सर्वांचा आवडता तास. प्राथमिक शाळेत असतानाच्या काही खास आठवणी नाहीत. पण माध्यमिक विभागात आल्यावर मात्र पी.टी. चा तास कधी येतो त्याची आतूरतेने वाट पाहिली जायची. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे शाळेत असतानासुद्धा मैदानात जायला मिळायचे. शाळेसमोर एवढं मोठ्ठ मैदान असण म्हणजे अहोभाग्यच!
पी.टी. शिकवायला माझ्या आठवणीप्रमाणे टि .पी. पवार सर होते. अगदी साधे होते, कधी कोणाला रागावल्याचे आठवत नाही. तसं तर पीटीच्या तासाला नेहमीच्याच उठाबशा आणि कवायतीचे प्रकार शिकवले जातं. मला आर.एस.पी.त आपली निवड व्हावी असं मनापासून वाटायचं, कारण २६ जानेवारीला बँडच्या तालावर चालणारी आर.एस.पी.ची परेड खूप आकर्षक असे. पण आगे बढ, पीछे मुड, दाहिने मुड, बाहे मुड हे कधी नीट जमलंच नाही. आताही दाहिने मुड म्हणजे डावीकडे वळायचं की उजवीकडे पटकन लक्षात येत नाही.😀
मैदानी खेळात ज्या सांघिक स्पर्धा होत त्यात डॉज-बॉल, लंगडी , खो-खो , कबड्डीच्या स्पर्धाही होत. (समीर पाटीलची वेगवान लंगडी अजूनही आठवते) दहावीत असताना आमच्या वर्गात दिंगबर जाधव, अनिल जाधव, विश्वनाथ जुवळे, नरेश दळवी, विवेक सारखे चांगले क्रिकेटपटू होते. अर्थात मैदानी खेळाच्या कुठल्याच टिममध्ये मी कधी निवडला गेलो नाही. कदाचित माझ्या शरीरयष्टीमुळे असेल. परंतु दुसऱ्या वर्गाशी स्पर्धा असली कि खेळणाऱ्यांपेक्षा आमच्यासारखे प्रेक्षकच जास्त जोशात असत.
कधी कधी पीटीच्या तासाला आम्हाला एकदम मोकाट सोडल जाई. मैदानात राहून काय करायचे ते करा. अशावेळी आबाधुबी नावाचा डेंजरस खेळसुद्धा आम्ही खेळत असू. (आबाधुबी म्हणजे रबरी चेंडूने एकमेकांना मारणे.) त्यात पी.के. चा नेम सही होता. मित्रांनो आता जरा बसल्या बसल्या कल्पना करा कोणीतरी मारलेला रबरी चेंडू सण्णकन् तुमच्या पाठीत बसलाय! वाटते ना भीती? 😱 (म्हणून म्हटलं डेंजरस) पण तेव्हा काहीच वाटायच नाही.
कधी योग जुळून आला तर आमचा आणि कन्याशाळेचा पीटीचा तास एकाचवेळी असे, बालपणींच्या वर्गमैत्रिणींचे दर्शन होई. फक्त दूरदर्शन संभाषण नाही. 😉 बरं अखियोंसे गोली मारे असही काही नव्हतं. एकूणच प्यार मोहब्बत,प्रेम इश्क ह्या संकल्पना त्याकाळी आजच्याएवढ्या सर्रास झाल्या नव्हत्या (याबाबतीत दुमत असू शकते हो 😷 प्रत्येक काळात, काळाच्या पुढे असणारे काही धुरंधर असतात, तसे आमच्या वर्गातही होते.... असतील 😍). कन्याशाळा मैदानात असली तरी आम्ही मात्र आमच्या खेळातच रमलेले असू.
आता शाळेतील पी.टी. चा तास संपून बरीच वर्षे झालीयत पण मन अजूनही मैदानावर रेंगाळत आहे. आता दैनंदिन वेळापत्रक तुमचं तुम्हीच बनवू शकता , त्यामुळे तुम्ही स्वतःसाठी पी.टी. चा तास राखून ठेवायला काहीच हरकत नाही.
कोणे एके काळच्या मस्तीखोर शाळकरी मुलांनो (तसे संजय डी. सारखे काही अजूनही मस्तीखोर आहेत) तुमच्याही शाळेतील पी.टी. च्या तासाच्या काही खास आठवणी असतील.
सावधान .... विश्राम 😀
तुमची प्रतिक्रिया लिहा