दरवर्षी दहावीचा रिझल्ट लागला कि बरेच पालक विचार करतात कि पाल्याला ९० टक्के किंवा जास्त मार्कस् मिळणे म्हणजे यशस्वी आयुष्याची गुरूकिल्ली सापडणे. अर्थात ९० टक्के मार्कस् मिळविणे म्हणजे चांगलीच आणि अवघड गोष्ट आहे, पण मिळालेच पाहिजे हा अट्टाहास चुकिचा आहे.
आपल्याला दहावी होऊन खूप वर्षे झाली पण आपल्या पालकांनी आपल्यावर एवढा दबाव आणला नसेल जेवढा हल्लीचे पालक आणतात. फारफार तर "तो शेजारचा बंडू बघ कसा अभ्यास करतोय आणि तू दिवसभर ऊंडरत असतो" असं म्हणून पालक आपल्याला दहावीच्या परीक्षेची आठवण करून देत. मला वाटत दहावीला दिवे न लावताही आपण सर्वजण बऱ्यापैकी चांगले आयुष्य जगत आहोत. (काही जणांनी चांगले मार्कस् मिळवले होते)
आता आयुष्यात यशस्वी किंवा आनंदी होणे ह्या सापेक्ष गोष्टी आहेत. बुडाखाली स्वत:ची आलिशान एसी गाडी असतानाही ड्राइव्हिंगचा आनंद मिळेलच असेल नाही, त्याऐवजी बालपणी भाड्याच्या सायकलीवर मारलेली रपेट अजूनही मनाला आनंद देऊन जाते.
आनंदी जीवन जगण्याची कला ज्याची त्याने शिकायची असते. (हल्ली त्याचेहि कोचिंग क्लासेस असतात).
आता हेच बघा ना मी आणि माझा मित्र एखादं दिवशी दोन दोन तास सगळ विसरून कॅरम खेळत बसतो. दहा रूपयाच्या बोरिक पावडरमध्ये लाखमोलाचा आनंद! तो आनंद काही जण प्रवास करण्यात शोधतात, काहीजण संगीतात शोधतात तर काही संगतीत शोधतात. काही चक्क थर्टी-सिक्सटी-नाईन्टी ची प्रमेय सोडवण्यात तो आनंद मिळवतात. आनंदी, समाधानी जीवन जगण्याची प्रत्येकाची स्वत:ची गणितं असतात. इतरांना त्रास न देता आपण कोणत्याही मार्गाने आनंद मिळवावा, अर्थात वास्तवाचे भानही ठेवायला हवे!
सर्व उत्तीर्ण विद्यार्थी आणि पालकांचे अभिनंदन!!! नापासांनी पुन्हा नव्या जोमाने तयारी करा 👍
अवधूत2 years ago
विनायक2 years ago
तुमची प्रतिक्रिया लिहा