२८ जून २०२०
काय म्हणतो पाऊस? 🌧️
- प्रसाद भुर्केखरंच...
काय म्हणतो पाऊस?
बाहेर धो धो पाऊस, कॉलेजला सुट्टी... ,अरे घरात काय करतोयस..., असं अण्णांनी फक्त म्हणणं...
पडत्या फळाची आज्ञा घेऊन जिन्स आणि खादीचा झब्बा अडकवून आईच्या समोर हातात छत्री घेऊन बाहेर पडणं...
छत्री बंदच ठेवून मित्रांबरोबर समुद्रावर फिरत पावसात मनसोक्त भिजणं...
चौपाटीवर भाजलेलं तिखट मीठ लिंबू लावलेलं मक्याचं कणीस बिनधास्त बोटं चाटत खाताना गाडीवरच्या शेगडीजवळ उभं राहून धग अनुभवणं...टपरीवरचा वाफाळणारा चहा घेताना फक्त सिगरेट विझू नये म्हणूनच छत्री उघडणं...☔

खरंच...
काय म्हणतो पाऊस?...
तिच्याबरोबर बाईकवरून लॉंगड्राईव्हला जाताना अचानक पावसाचं येणं...
उघड्या चेहऱ्यावर टपोरे थेंब झेलताना माझं बेफाम चालवणं...
खांद्यावरची हाताची पकड घट्ट करत, तिचे कानात "जरा हळू..." असं कुजबुजतानाचे उष्ण श्वास आणि तिच्या केसांचे कानाला होणारे निसटते स्पर्श ...
एनडीएजवळ पोहोचल्यावर रस्त्याच्या कडेला थांबणं...
आकाशाकडे पाहात मध्येच डोळे मिटून चेहेऱ्यावर पाऊस झेलणारी ती आणि तिच्या केसांतून निथळणारा पाऊस डोळ्यांत साठवू पाहणारा मी...💞
खरंच...
काय म्हणतो पाऊस?...
वरळी सी फेस... समुद्र आणि आकाशाला सांधणारी ती अस्पष्ट रेघ...
काचा बंद असल्यामुळे समोर नुसताच दिसणारा पाऊस आणि वायपर्सची लयबद्ध हालचाल...
कानात गाडीतल्या अदनान सामीच्या "भीगी भीगी रातों में..." गाण्याचे आणि त्यातल्या पियानोचे जादुई सूर...
हातात गुंफलेले हात आणि एकमेकांकडे पाहाताना नजरेला जाणवलेलं स्मित...🥰
खरंच...
काय म्हणतो पाऊस?...
संतत सरींनी बरसणारा तो...
लेक अजून घरी परतली नाही, म्हणून जिवाला घोर लावणाराही तोच...
पण "बाबा, मी स्टेशनवर आलेय" असा फोन येणं, आणि "गाडी घेऊन जा" म्हणणाऱ्या तिच्या आईकडे दुर्लक्ष करून हट्टाने भिजण्यासाठी बाईक काढणं...🏍️
पन्नाशीकडे पोहोचलेल्या मला विशीत आणणारा तोच...
केव्हाचाच मला पाऊस हेच सांगतोय, की मी तोच आहे...
फक्त तुझे संदर्भ बदलतायत...😍
...पाऊस हेच सांगतोय...
You can Like, Share & Comment
तुमची प्रतिक्रिया लिहा